लांजा : तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे १९ ऑक्टोबर २०२६ रोजी घडलेल्या श्रीमती वैशाली विलास हेगिष्टे यांच्या निर्घृण हत्येच्या आणि सोन्याच्या बांगड्यांच्या चोरीच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला असतानाच, या प्रकरणासह मागील काही वर्षांत घडलेल्या इतर संशयास्पद मृत्यू व चोऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी वेरवली खुर्द येथील ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात वेरवली खुर्दच्या ग्रामस्थांच्या वतीने लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना एक सविस्तर लेखी निवेदन सादर करण्यात आले.
वेरवली बुद्रुक येथील हत्येच्या घटनेनंतर वेरवली बुद्रुक, वेरवली खुर्द आणि पडवण या संपूर्ण परिसरात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत; मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केवळ एवढ्यावरच न थांबता यापूर्वी घडलेल्या संशयास्पद घटनांची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या हत्येच्या गुन्ह्यात संशयित आरोपीव्यतिरिक्त अन्य व्यक्तींचाही सहभाग असण्याची दाट शक्यता व्यक्त करत त्यादृष्टीने कसून तपास करावा, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली आहे.
निवेदनात मागील काही वर्षांत घडलेल्या अनुत्तरित गुन्ह्यांचा पाढाच वाचण्यात आला आहे. यामध्ये जून २०२२ मध्ये वेरवली खुर्द-कातळवाडी येथील श्रीमती नम्रता हेमंत लाड यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरीला जाऊन त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याची घटना, कातळवाडीतील श्री. मारुती नाना साळसकर यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला जाणे, ऑक्टोबर २०२६ मध्ये श्री. दिनकर बाणे यांच्या पत्नी सौ. सरिता बाणे यांचे दुचाकीस्वाराने भरदिवसा मंगळसूत्र पळवणे, २०२१-२२ दरम्यान गावातील ग्रामदैवत मंदिरातील घंटा चोरीस जाणे, आगरवाडी येथील गणपती मंदिराची दानपेटी फोडणे आणि श्री. विजय खेडेकर यांच्या बंद घरातील वस्तू चोरीला जाणे या घटनांचा समावेश आहे. यातील काही प्रकरणांची पोलिसांत नोंद असूनही अनेक बाबी अद्याप अनुत्तरित असल्याने, या सर्व प्रकरणांचा हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने सखोल तपास करून ठोस पुरावे गोळा करावेत आणि गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सरपंच सुनील बाळकृष्ण खुलम, चंद्रकांत महादेव मांडवकर, अरुण बाळकृष्ण डोळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत.





