राजापूर : राजापूर तालुक्यातील जवळेथर-मिळंद गावच्या सीमेवर भरधाव वेगाने आणि चुकीच्या दिशेने आलेल्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात स्कुटीस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. ही घटना २२ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जवळेथर ते पाचल मार्गावरील एका धोकादायक वळणावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, साई तन्मय ट्रॅव्हल्सचा चालक गौरव गजानन पवार (वय ३६, रा. वरचीपेठ, राजापूर) हा आपल्या ताब्यातील बस (क्रमांक MH ०१ EV ५४९५) घेऊन जात होता. रस्त्याची परिस्थिती आणि वळणाचा अंदाज न घेता चालकाने बस भरधाव वेगाने चुकीच्या बाजूला (रॉंग साईड) चालवली. याच दरम्यान समोरून आपल्या हिरो प्लेझर स्कुटीवरून (क्रमांक MH ०८ AW ५३४८) येत असलेले स्वरूप सुहास सप्रे (वय ३४, रा. जवळेथर सुर्वेवाडी, ता. राजापूर) यांना या ट्रॅव्हल्सने थेट समोरासमोर जोराची धडक दिली.
या जोरदार धडकेमुळे स्वरूप सप्रे रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या शरीराला लहान-मोठ्या गंभीर दुखापती झाल्या. अपघातात स्कुटीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी जखमी तरुणाची आई स्मिता सुहास सप्रे (वय ६२, रा. जवळेथर सुर्वेवाडी) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालक गौरव पवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) सह मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






