२० दिवसांत २५ गुन्हे, ३५ आरोपी गजाआड तर उपविभागीय अधिकाऱ्यांकडून ३ वर्षांत २१ जण हद्दपार
रत्नागिरी: जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करी व सेवनाविरोधात सर्व यंत्रणांनी अधिक आक्रमक भूमिका घेत समन्वय राखून काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत. मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक बोटीची मत्स्यव्यवसाय विभागाने तात्काळ नोंदणी पूर्ण करून अहवाल सादर करावा, तसेच एमआयडीसी, पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांची अचानक तपासणी करावी, अशा कडक सूचना त्यांनी दिल्या. नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह क्षेत्रीय पोलीस अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
केंद्र आणि राज्य शासन या मोहिमेवर थेट लक्ष ठेवून असल्याने सर्व विभागांनी केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कारवाई आणि जनजागृतीवर भर द्यावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले. सन २०२९ पर्यंत देशाला नशामुक्त करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी शिक्षण विभागाने शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रबोधन मोहीम राबवावी, तर बंदर विभागाने पोलीस व उत्पादन शुल्क यंत्रणेला सोबत घेऊन नियमित तपासण्या कराव्यात. अन्न व औषध प्रशासनाने नियंत्रित व बंदी असलेल्या औषधांचा नशेसाठी अवैध वापर होतो का, यावर करडी नजर ठेवण्याचे आदेशही देण्यात आले.
या मोहिमेत जिल्हा पोलीस दलाने धडक कारवाई सुरू ठेवली असून अवघ्या २० दिवसांत २५ गुन्हे दाखल करून ३५ आरोपींना जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. या कारवाईदरम्यान २२ ग्रॅम ब्राऊन शुगर (हिरॉईन) आणि तब्बल २ हजार ७८५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. मागील वर्षभरात दाखल १२४ गुन्ह्यांसह आतापर्यंत एकूण ६० कारवायांमध्ये ८६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गांजा व ब्राऊन शुगरच्या सेवनाचे प्रमाण नेपाळी कामगारांमध्ये अधिक आढळून येत असल्याने सागरी सुरक्षेच्या दृष्टीने बोटींची सखोल तपासणी होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामसभा आणि सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातही व्यसनमुक्तीसाठी जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या बाजूला महसूल व दंडाधिकारी स्तरावरही अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध कठोर पावले उचलण्यात येत असून, प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत एकाच दिवसात तब्बल सहा समाजकंटकांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. यामध्ये सचिन राजाराम म्हापूसकर, अरमान लियाकत धामस्कर, नजब असीफ मिरजकर, मस्तान मकदुम शेख, फुरकान यासिन फणसोपकर आणि अब्दुल रौफ इक्बाल डोंगरकर यांचा समावेश आहे. वर्ष २०२३ पासून सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत प्रांताधिकारी देसाई यांनी आजअखेर एकूण २१ जणांवर हद्दपारीची धडक कारवाई केली असून, प्रशासनाच्या या आक्रमक पावलांमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थ पुरवठादारांचे धाबे दणाणले आहेत.






