मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या विविध जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. बिहारच्या 8, कर्नाटकातील 4, महाराष्ट्रातील 5 आणि उत्तर प्रदेशच्या 11 जागांचा या निवडणूक कार्यक्रमात समावेश आहे.महाराष्ट्रातील 5 जागांमध्ये 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे.
राज्यातील छत्रपती संभाजीनगर पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती विभाग शिक्षक आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार आहे. त्यापूर्वी या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे.पुणे शिक्षक मतदारसंघात सध्या काँग्रेस पुरस्कृत आमदार जयंत आसगावकर हे प्रतिनिधित्व करत आहेत. या जागेसाठी महायुतीतील भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागावाटपावरून चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मंगेश चिवटे हे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जाते. मात्र, पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा शिंदे गटाला मिळणार की भाजपकडे राहणार, याबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही.आगामी 23 ऑक्टोबरला होणाऱ्या या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे. उमेदवारांची अधिकृत घोषणा आणि आघाड्यांमधील जागावाटपानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम
अधिसूचना जारी : 29 सप्टेंबर, मंगळवार
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : 6 ऑक्टोबर, मंगळवार
उमेदवारी अर्जांची छाननी : 7 ऑक्टोबर, बुधवार
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 9 ऑक्टोबर, शुक्रवार
मतदान : 23 ऑक्टोबर, शुक्रवार
मतदानाची वेळ : सकाळी 8 ते दुपारी 4
मतमोजणी : 27 ऑक्टोबर , मंगळवार
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख : 31 ऑक्टोबर, शनिवार
विधान परिषद निवडणुक : महाराष्ट्रातील पाच जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान
Leave a Comment





