रत्नागिरी: जिल्ह्यात वेगवेगळ्या भागांतून अवघ्या चोवीस तासांच्या अंतराने दोन २१ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोन्ही प्रकरणांत अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त होत असून, संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकाच वेळी दोन तरुणींचे अपहरण झाल्याच्या घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात तीव्र खळबळ उडाली आहे.
पहिली घटना खेड तालुक्यात घडली असून दाभिळ नाका, सातवीन गाव येथील सिंधुरा सचिन कानकुटे (वय २१) या २८ सप्टेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास घरातून अचानक निघून गेल्या. त्या घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र कोणताही ठावठिकाणा न लागल्याने पती सचिन भगवान कानकुटे (वय २८) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात इसमाने त्यांना बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्याच्या हेतूने पळवून नेल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला असून, त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
दुसरी घटना पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावडे आंबेरे, हनुमानवाडी येथे घडली. येथील सानिया दामोदर नाटेकर (वय २१) ही तरुणी २९ सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास रत्नागिरी येथे मोबाईलचा डिस्प्ले बदलून येते असे सांगून घरातून पडली, मात्र ती उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. कुटुंबीयांनी संपर्क साधण्याचा व शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ती मिळून आली नाही. अखेर तिची आई दामिनी दामोदर नाटेकर (वय ४५) यांनी आपल्या मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून बेकायदेशीरपणे पळवून नेल्याची तक्रार पूर्णगड पोलिसांत दाखल केली.
या दोन्ही घटनांप्रकरणी खेड व पूर्णगड पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १४०(३) अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. एकाच वयोगटातील दोन तरुणी अचानक अशा प्रकारे बेपत्ता झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, दोन्ही पोलीस ठाण्यांची पथके या तरुणींचा कसून शोध घेत आहेत.






