पाचल/ अंकुश पोटले: मागील वर्षी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीमध्ये प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्र्यांच्या हस्ते सत्कारमूर्ती ठरलेल्या राजापूर तालुक्यातील कोळवण खडी येथील आदर्श शेतकरी नागेश बने यांच्या भातशेतीवर यंदा भीषण करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. रोगाच्या तीव्र प्रादुर्भावामुळे त्यांची संपूर्ण भातशेती पूर्णतः नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली असून, मागील वर्षीचा विजेता शेतकरी यंदा स्वतःच्याच हातातोंडाशी आलेल्या पिकाला मुकण्याची अत्यंत विदारक वेळ ओढवली आहे. बने यांच्याप्रमाणेच परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या भातशेतीची यामुळे मोठी वाताहत झाली असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
एकीकडे ऐन हंगामात भातपिकावर करपा रोगाचा झालेला प्रादुर्भाव आणि दुसरीकडे पावसाने अचानक पाठ फिरवल्याने तीव्र उन्हाची बसणारी झळ, अशा दुहेरी कात्रीत राजापूर तालुक्यातील शेतकरी सापडला आहे. हातातोंडाशी आलेली भाताची पिके उन्हाच्या तडाख्यामुळे जागीच खुंटून शेती संपुष्टात येत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. अशा बिकट परिस्थितीत जगायचे तरी कसे, असा गंभीर पेच शेतकरी वर्गासमोर उभा ठाकला आहे. शासनाने परिस्थितीचा अभ्यास करून आधीच दुष्काळ जाहीर केला असला, तरी वर्षभराची कष्टाची शेतीच जर संपूर्ण उद्ध्वस्त झाली तर केवळ तुटपुंज्या मदतीने शेतकऱ्यांचे सांत्वन कसे होणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे कृषी विभागाने प्रत्येक बाधित शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य व भरीव आर्थिक मोबदला तातडीने मिळवून द्यावा, अशी आग्रही मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.






