नाटे : नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाणार-इंगळवाडी येथे खाडीपात्रात कालवे काढण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक घटनेनंतर अद्याप बेपत्ता असलेल्या अन्य एका बालिकेचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने युद्धपातळीवर शोधमोहीम हाती घेतली आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे (भा.पो.से.) यांनी स्वतः खाडीपात्रात उतरून बोटीतून या शोधकार्याची धुरा सांभाळली असून, घटनास्थळाची पाहणी करून शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला.
दिनांक ११ ऑक्टोबर रोजी नाणार-इंगळवाडी नजीकच्या खाडीपात्रात ही भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत तीन बालकांचे मृतदेह हाती आले असले तरी त्याच कुटुंबातील एक चिमुरडी अद्याप बेपत्ता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी नाटे येथे धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटना घडल्यापासून पोलीस अधीक्षक बगाटे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली नाटे पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार तसेच स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमारांच्या साहाय्याने लहान-मोठ्या बोटींद्वारे दिवस-रात्र अविरतपणे खाडीपरिसरात शोधकार्य राबवले जात आहे.
या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून खाडी, समुद्रकिनारे, नद्या व अन्य जलस्रोतांजवळ वावरताना योग्य ती खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. भरती-ओहोटीची वेळ, पाण्याचा वेगवान प्रवाह आणि पाण्याची खरी खोली याचा अंदाज न आल्यामुळे अशा प्रकारच्या भीषण दुर्घटना ओढवतात, याकडे लक्ष वेधत नागरिकांनी लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत अत्यंत दक्ष राहावे, अशा धोकादायक जलक्षेत्रांमध्ये लहान मुलांना एकटे सोडू नये अथवा त्यांना अशा ठिकाणी जाण्यास मज्जाव करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






