विनायक सावंत / सावर्डे : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील उदेगवाडी मार्गावरील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील महत्त्वाच्या पुलावर मोठ्या प्रमाणावर उंबर, पिंपळासह विविध प्रकारची अनावश्यक झाडे-झुडपे फोफावली आहेत. या वनस्पतींची मुळे पुलाच्या काँक्रीटमध्ये खोलवर रुजल्याने पुलाच्या मूळ संरचनेला धोका निर्माण झाला असून, पुलावरील धोकादायक झाडे तातडीने हटवून सुरक्षिततेच्या दृष्टीने दुरुस्ती करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांस्कृतिक व चित्रपट विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा सावर्डे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य देवराज गरगटे यांनी केली आहे.
उदेगवाडी, कासारवाडी आणि परिसरातील वाड्या-वस्त्यांना जोडणारा हा पूल स्थानिक शेतकरी, नोकरदार, रुग्ण आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, पुलाचे कठडे आणि संरक्षक भिंतींमध्ये वाढलेली झाडे वेळीच हटवली गेली नाहीत, तर काँक्रीटला तडे जाऊन पुलाचे आयुष्यमान झपाट्याने कमी होण्याची दाट भीती निर्माण झाली आहे.
या गंभीर समस्येची प्रत्यक्ष पाहणी श्री. गरगटे यांनी समाजसेवक व उद्योजक रुपेश कोकाटे यांच्यासमवेत केली. पाहणीदरम्यान पुलाच्या कठड्यांमध्ये आणि बाजूच्या संरक्षक भागांमध्ये झाडांची मुळे खोलवर गेल्याचे स्पष्ट दिसून आले.
या पार्श्वभूमीवर गरगटे यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असून, जिल्हा परिषद सदस्या पूजाताई निकम यांच्याही ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. “पुलावरील वाढलेल्या झाडांमुळे पुलाला अक्षरशः वेढा पडला आहे. ही झाडे वेळेत हटवली नाहीत तर भविष्यात पुलाच्या सुरक्षिततेला मोठा तडा जाऊ शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने कारवाई करून पुलाला मोकळा श्वास द्यावा,” असे गरगटे यांनी स्पष्ट केले. स्थानिक ग्रामस्थांनीही त्यांच्या या मागणीला एकमुखाने पाठिंबा दिला आहे.






