रत्नागिरी : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचे विसरलेले किंवा गहाळ झालेले मौल्यवान साहित्य सुरक्षित शोधून देण्याच्या ‘ऑपरेशन अमानत’ या विशेष मोहिमेअंतर्गत रत्नागिरी रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) पुन्हा एकदा तत्परता दाखवत कर्तव्यदक्षतेचा प्रत्यय दिला आहे. गाडी क्रमांक १२४३१ राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा विसरलेला सुमारे ७० हजार रुपये किमतीचा ‘आयफोन १३ प्रो मॅक्स’ रत्नागिरी आरपीएफने शोधून मूळ मालकाकडे सुपूर्द केला.
सदर गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा महागडा मोबाईल गाडीतच राहिल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर रत्नागिरी आरपीएफ पथकाने तात्काळ हालचाली केल्या. रत्नागिरी आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) अतुल यादव यांनी तातडीने शोधमोहीम राबवून हा मोबाईल सुरक्षितपणे ताब्यात घेतला. त्यानंतर संबंधित प्रवाशाशी संपर्क साधून त्याची रीतसर ओळख व मालकी हक्काची पडताळणी करण्यात आली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा फोन प्रवाशाच्या स्वाधीन करण्यात आला.
आपला गहाळ झालेला मौल्यवान ऐवज सुस्थितीत परत मिळाल्याने प्रवाशाने समाधान व्यक्त करत रेल्वे सुरक्षा दलाच्या जलद आणि प्रामाणिक सेवेबद्दल मनापासून आभार मानले. आरपीएफ जवानांच्या या कार्यतत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.






