रत्नागिरी: मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित ५९ व्या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने उल्लेखनीय यश मिळवले आहे. मुंबईत संपन्न झालेल्या या महोत्सवातील शास्त्रीय गायन स्पर्धेत महाविद्यालयाची विद्यार्थिनी तन्वी मोरे हिने आपल्या सुरेल गायनाने परीक्षकांची मने जिंकत मानाचे रौप्यपदक पटकावले. तन्वी हिला रत्नागिरीच्या सुप्रसिद्ध संगीत मार्गदर्शक सौ. विनया परब यांचे मोलाचे गुरू व मार्गदर्शक म्हणून लाभले असून, तिच्या या सादरीकरणास स्वरूप नेने यांनी तबल्यावर तर श्रीरंग जोगळेकर यांनी हार्मोनियमवर उत्कृष्ट साथसंगत केली. या तिघांच्या प्रभावी संगीतमय जुगलबंदीमुळे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विद्यापीठाच्या प्रतिष्ठित अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करून महाविद्यालयाचा गौरव वाढविल्याबद्दल यशस्वी विद्यार्थिनी तन्वी मोरे हिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तिच्या या यशाबद्दल गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साकळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी तसेच सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






