मुंबई: राज्यातील शालेय पोषण आहारात मोठा आणि पोषणमूल्य वाढवणारा बदल करत तांदळाचे प्रमाण घटवून त्याऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू आणि सोया यांसारख्या पौष्टिक भरडधान्यांचा आहारात समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत हे निर्देश देण्यात आले. याच बैठकीत योजनेचा विस्तार करत इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांनाही शालेय पोषण आहाराचा लाभ देण्याबाबत तात्काळ सकारात्मक प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. याशिवाय अंगणवाडीतील बालकांच्या आहारासाठी २०१८ सालापासून कायम असलेला प्रतिदिनी अवघा आठ रुपयांचा दर आजच्या वाढत्या बाजारभावानुसार त्वरित सुधारण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
सध्याच्या रचनेनुसार प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना दररोज १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना १५० ग्रॅम तांदूळ दिला जातो; मात्र हा तांदूळ गरजेपेक्षा जास्त असल्याने वाया जात असल्याचे बैठकीत समोर आले. यावर शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी तांदळाचे प्रमाण मर्यादित ठेवून ज्वारी, गहू, नाचणी, बाजरी आणि सोया यांचा आहारात अंतर्भाव करण्याचा पर्याय मांडला, ज्याला मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्यता दिली. यासोबतच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे अर्थसंकल्पातील पाच टक्के राखीव निधीचा विनियोग सूक्ष्म पोषण व नवनवीन उपक्रमांसाठी करत विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा पनीर, टोफू, केळी किंवा मिलेट बार यांसारखे प्रथिनेयुक्त खाद्यपदार्थ देण्याचे निश्चित करण्यात आले आहे; या निवडीचे अधिकार स्थानिक उपलब्धतेनुसार जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच नागरी भागातील अन्न गुणवत्तेसाठी अंगणवाडी पोषण आहार, अमृत आहार आणि शालेय पोषण आहार या सर्व योजनांची अंमलबजावणी महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात केंद्रीय स्वयंपाकगृह पद्धतीने करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.







