देवगड : महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमातील नियमांना हरताळ फासत सिंधुदुर्गच्या सागरी हद्दीत सुरू असलेल्या बेकायदा पर्ससीन मासेमारीविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने धडक कारवाईचे सत्र आरंभले आहे. रविवारी सकाळी विजयदुर्ग जेट्टीसमोर अवघ्या तीन वाव पाण्यात नियमबाह्य पद्धतीने पर्ससीन मासेमारी करताना आढळलेली रत्नागिरी येथील अर्शद अ. लतीफ पावसकर यांच्या मालकीची ‘SAAD MAAZ’ (नोंदणी क्र. IND-MH-4-MM-3731) ही नौका अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत जप्त केली. या नौकेवर एकूण २० परप्रांतीय खलाशी कार्यरत असल्याचे तपासणीत उघड झाले असून, महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम, १९८१ चे उघड उल्लंघन केल्याप्रकरणी ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली देवगडचे अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी सुरक्षा रक्षकांच्या पथकासह ही धडक मोहीम राबवली. जप्त करण्यात आलेली ही नौका सुरक्षितपणे देवगड बंदरात आणण्यात आली असून संबंधितांवर अधिनियमांतर्गत तात्काळ कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपूर्वीच अशाच एका पर्ससीन नौकेवर कारवाई करण्यात आली होती; त्यानंतर लागोपाठ झालेली ही दुसरी मोठी कारवाई असल्याने अवैध मासेमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राबाहेर जाऊन कोणीही मासेमारी करण्याचा प्रयत्न केल्यास कोणत्याही परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही आणि दोषींवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी दिला आहे.
दरम्यान, शासनाच्या नियमांनुसार १२ समुद्री मैलांच्या आत पर्ससीन मासेमारीस पूर्ण बंदी असतानाही अशा प्रकारे होणाऱ्या घुसखोरीमुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारी धोक्यात येत असून सागरी जैवविविधतेचे अतोनात नुकसान होत असल्याची तक्रार स्थानिक मच्छीमारांकडून दीर्घकाळापासून केली जात होती. प्रशासनाने दाखवलेल्या या आक्रमक भूमिकेचे आणि नियमित पाळत ठेवण्याच्या धोरणाचे स्थानिक मच्छीमार बांधवांकडून जोरदार स्वागत करण्यात येत असून, सागरी सुरक्षेबाबत प्रशासनाने दिलेला हा स्पष्ट व कठोर संदेश मानला जात आहे.






