गुहागर : तालुक्यातील रानवी येथील बीएसएनएलच्या टेलिफोन एक्सचेंजमधील पॉवर प्लांट रूमचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये ५० मीटर लांबीची डीसी पॉवर कॉपर केबल आणि डीसी-डीबी बॉक्समधील बसबार प्लेटचा समावेश आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ते ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.१५ वाजेपर्यंतच्या कालावधीत रानवी येथील टेलिफोन एक्सचेंजच्या डीसी पॉवर प्लांट रूममध्ये ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी कार्यालयाच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर तेथील सुमारे २५ हजार रुपये किमतीची लाल व निळ्या रंगाची, १५० स्क्वेअर एमएम क्षमतेची सुमारे ५० मीटर लांबीची जुनी वापरती डीसी पॉवर कॉपर केबल चोरून नेली. तसेच ४५० रुपये किमतीची डीसी-डीबी बॉक्समधील जुनी वापरती बसबार प्लेटही लंपास केली.
या चोरीप्रकरणी बीएसएनएलमध्ये ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले विजेंदर गुलेरिया (वय ३८, सध्या रा. गुरववाडी, गुहागर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून दोन अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुहागर पोलीस ठाण्यात ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ७.४७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.




