मुंबई : कळंबोली यार्ड विभागात एका मालगाडीच्या ब्रेक व्हॅनची ट्रॉली अचानक रुळावरून घसरल्याने कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ‘अप’ मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पॉईंट क्रमांक १५८ जवळ घडलेल्या या तांत्रिक अपघातामुळे या मार्गावरून धावणाऱ्या महत्त्वाच्या प्रवासी रेल्वे गाड्यांची वाहतूक खोळंबली असून प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.
या अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या मडगाव–सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस, सावंतवाडी रोड–दिवा पॅसेंजर, गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेस आणि मडगाव–वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस या प्रमुख गाड्यांच्या वेळापत्रकावर थेट परिणाम झाला असून त्या विविध स्थानकांवर रखडल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे तांत्रिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून रुळावरून घसरलेली ट्रॉली पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून विस्कळीत झालेली वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.





