विरार: आजारपणाचा असह्य ताण आणि वाढत्या आर्थिक विवंचनेला कंटाळून विरार पश्चिमेकडील एका भाड्याच्या सदनिकेत तीन अविवाहित बहीण-भावांनी विष प्राशन करून आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी या तिघांनी गुजराती भाषेत चित्रीत केलेला एक वेदनादायी व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला असून, त्यामध्ये त्यांनी आपल्या हलाखीच्या परिस्थितीचा आणि गंभीर आजारपणाचा सविस्तर पाढा वाचल्याचे समोर आले आहे.
विरार (पश्चिम) येथील नामांकित ग्लोबल सिटी संकुलातील ‘गार्डन एव्हेन्यू’ इमारतीच्या ‘डी’ विंगमधील फ्लॅट क्रमांक १२०३ मधून गुरुवारी अचानक तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ स्थानिक पोलिसांना पाचारण केले. माहिती मिळताच बोळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांच्या पथकाने गुरुवारी मध्यरात्रीनंतर अडीच वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली. बंद सदनिकेचा दरवाजा तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला असता, तिघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेले आढळून आले. प्राथमिक पाहणीनुसार कुमार मेहता (वय ५०), दिपेश मेहता (वय ५२) आणि खेवना मेहता (वय ४८) या तिघांचा मृत्यू साधारण तीन ते चार दिवसांपूर्वीच झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, पंचनाम्यानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत हे कुटुंब २०२५ पासून या घरात भाडेतत्त्वावर वास्तव्यास होते. या तीन भावंडांपैकी एका भावाला अर्धांगवायूचा झटका आला होता, तर दुसरा भाऊ कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी लढा देत होता. घरात उत्पन्नाचे कोणतेही साधन शिल्लक नसताना वैद्यकीय उपचारांचा प्रचंड खर्च भागवणे त्यांच्यासाठी अशक्य झाले होते. आर्थिक चणचण असह्य झाल्यामुळे त्यांनी आपल्या दुसऱ्या बहिणीकडेही मदतीची याचना केली होती, अशी माहिती संबंधित बहिणीने पोलिसांना दिली. अखेर या दुष्टचक्राला कंटाळून तिघांनीही एकाच वेळी विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपवल्याचे स्पष्ट होत असून, बोळिंज पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करून पुढील कायदेशीर तपास सुरू करण्यात आला आहे.





