राजापूर : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर झालेल्या ओळख आणि मैत्रीचा गैरफायदा घेत एका अल्पवयीन युवतीला लॉजवर नेऊन अत्याचार करणे, त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करत बदनामी करणे या गंभीर प्रकरणी राजापूर पोलिसांनी आता आपला तपासाचा फास अधिक आवळला आहे. या प्रकरणात मूळ अल्पवयीन संशयित आरोपीवर पोक्सो अंतर्गत कारवाई केल्यानंतर, आता पोलिसांनी घटना घडलेल्या कोदवली साईनगर पुनर्वसन वसाहतीतील ‘मँगो लॉज’चा मालक महंमद मुबारक ठाकूर (रा. मधीलवाडा, राजापूर) याच्याविरोधात कलम १७ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. याशिवाय, पीडितेचा तो आक्षेपार्ह व्हिडिओ इतरत्र प्रसारित करून तिची बदनामी करणाऱ्या आणखी चार तरुणांवरही माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ (बी) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही धक्कादायक घटना १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान कोदवली साईनगर येथील मँगो लॉजवर घडली होती. या प्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून राजापूर पोलिसांनी ७ सप्टेंबर रोजी तातडीने गुन्हा दाखल करून अत्यंत संवेदनशीलतेने सखोल तपास सुरू केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक बाबींचा कसून आधार घेत हा व्हिडिओ नेमका कोणाकडे पाठवला गेला आणि पुढे तो कोणी कोणी सोशल मीडियावर व्हायरल केला, याची साखळी उघडकीस आणली. त्यातून समोर आलेल्या माहितीनुसार प्रणय सुधाकर जोशी (वय १८, रा. सागवे नाखरेवाडी), आर्यन नरेश धुळप (वय १९, रा. सागवे चिंचाडी), सिध्देश सत्यवान कायंदेकर (वय २०, रा. सागवे कात्रादेवीवाडी) आणि यश गणपत आंबेरकर (वय २१, रा. सागवे कात्रादेवी वाडी) या चौघांनी आपल्याकडे आलेला तो व्हिडिओ पुढे व्हायरल केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
या गंभीर गुन्ह्यातील सर्व संशयित आरोपींना पोलिसांनी रीतसर नोटिसा बजावल्या असून, या प्रकरणाचा तपास पूर्ण करून लवकरच राजापूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या विकृत प्रवृत्तीच्या आरोपींवर आणि नियमांचे उल्लंघन करून अल्पवयीन मुलांना प्रवेश देणाऱ्या संबंधित लॉज मालकावर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून जोरदार स्वागत केले जात आहे.





