पाचल / तुषार पाचलकर: तालुक्यातील पाचल येथील पूर्ण प्राथमिक जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकच्या परिसरात शुक्रवारी, ३० ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन बिबट्यांचा वावर आढळल्याची माहिती समोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. शाळेच्या परिसरात बिबट्यांचा वावर असल्याची माहिती मिळताच शाळा प्रशासनाने सतर्कता बाळगत विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. मात्र, या घटनेची माहिती देऊनही वनविभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी न पोहोचल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
पाचल येथील एका ग्रामस्थालाही दोन दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याचा वावर आढळल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शाळेच्या परिसरात बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेच्या परिसरातच बिबट्यांचा वावर असल्याची माहिती समोर आल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या घटनेची माहिती मिळताच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी सागरे यांनी विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना देऊन सतर्क केले. तसेच, ग्रामपंचायत पाचलच्या माध्यमातून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर दुपारनंतर घटनास्थळी पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे वनविभागाकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, संध्याकाळपर्यंत वनविभागाचा एकही अधिकारी अथवा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेच्या परिसरात बिबट्यांचा वावर असल्याची शक्यता असताना आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला असताना वनविभागाकडून प्रत्यक्ष पाहणीसाठी विलंब का झाला, असा सवाल आता उपस्थित होत आहे. केवळ माहिती घेऊन उपाययोजनांचे आश्वासन देण्यापलीकडे वनविभागाची प्रत्यक्ष कृती कधी दिसणार, असा प्रश्नही ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत पाचलने तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची माहिती घेतली. उपसरपंच आत्माराम सुतार, सदस्य विनायक सक्रे, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, लिपिक कल्पेश सुतार, शिपाई नंदू पांचाळ तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
शाळेच्या परिसरात बिबट्यांचा वावर असल्याची शक्यता व्यक्त होत असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने घटनेची दखल घेऊन घटनास्थळी धाव घेतली असताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांची अनुपस्थिती मात्र चर्चेचा विषय ठरली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता वनविभागाने तातडीने परिसराची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.





