तुषार पाचलकर (राजापूर): विद्यार्थीदशेत राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाचा स्वयंसेवक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांमध्ये समाजविषयक जाणीव निर्माण होते आणि सामाजिक समस्यांची प्रत्यक्ष ओळख होते. कोणत्याही सुधारणेची सुरुवात स्वतःपासून केल्यास समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे सहज शक्य होते, असे विचार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी व्यक्त केले. श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयात आयोजित ‘एनएसएस सप्ताहा’च्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या विभागात मिळणाऱ्या विविध संधींमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र बनते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सजगतेने कार्य करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. ए. डी. पाटील उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी, एनएसएसचा स्वयंसेवक हा हरहुन्नरी बनून स्वतःसह समाजाच्या प्रगतीसाठी सतत तत्पर राहतो, असे सांगत विद्यार्थ्यांनी सेवाभावी वृत्तीने कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकपर भाषणात प्रा. एस. जी. चव्हाण यांनी सप्ताहात राबविल्या जाणाऱ्या स्वच्छता अभियान, नशामुक्ती अभियान, टीबीमुक्त अभियान आणि अवयवदान यांसारख्या सामाजिक उपक्रमांची रूपरेषा स्पष्ट केली.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर प्रा. एस. एस. धोंगडे, प्रा. एस. व्ही. निंबाळकर, डॉ. बी. टी. दाभाडे, प्रा. एन. जी. देवण, प्रा. पी. पी. राठोड, प्रा. पी. के. कांबळे आणि ग्रंथपाल डॉ. मनोहर कोंडागुर्ले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. एस. जी. चव्हाण यांनी केले. या सोहळ्यास महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





