पाचल (तुषार पाचलकर): राजापूर तालुक्यातील व्यापारी केंद्र आणि गजबजलेले गाव म्हणून ओळख असलेल्या पाचल येथील नामांकित पाथरे कुटुंबीयांच्या घरी गणेशोत्सव यंदाही पारंपरिक भक्तीभाव आणि उत्साही वातावरणात साजरा होत आहे. गावातील जवळपास ५० ते ५५ सदस्यांचे सर्वात मोठे एकत्रित कुटुंब म्हणून ओळखले जाणारे पाथरे कुटुंब या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येत कौटुंबिक ऐक्य आणि संस्कृतीचा आदर्श निर्माण करत आहे.
पाचल गावचे माजी सरपंच आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवंगत वसंत दादा पाथरे यांचा गणपती म्हणून हा उत्सव संपूर्ण राजापूर तालुक्यात विशेष परिचित आहे. वसंत दादा यांनी सुरू केलेली ही समृद्ध सामाजिक व सांस्कृतिक परंपरा कुटुंबीयांनी आजही तितक्याच निष्ठेने जपली आहे. या गणेशोत्सवादरम्यान पारंपरिक भजन, हरिपाठ, फुगड्यांचे खेळ, दैनंदिन मंगलमय आरत्या आणि श्री सत्यनारायण महापूजा अशा विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे.
उत्सवाच्या काळात गावातील ग्रामस्थ, नातेवाईक यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर श्रींच्या दर्शनासाठी पाथरे यांच्या निवासस्थानी दररोज हजेरी लावत आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात ५० हून अधिक सदस्यांचे हे एकत्रित कुटुंब अशा प्रकारे एकत्र येत गणेशोत्सव साजरा करत असल्याने, हा सोहळा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक सलोखा आणि कौटुंबिक एकोप्याचे उत्तम उदाहरण ठरत आहे.





