राजापूर/तुषार पाचलकर: तालुक्यातील अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या टेल चॅनेलच्या खालच्या बाजूस मौजे पाचल आणि तळवडे या गावांना जोडणाऱ्या तसेच जवळेथरकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या पुलाच्या पुनर्बांधणीस प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे पाटबंधारे विभागामार्फत या ठिकाणी नवीन पूल उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे जामदा खोऱ्यातील दळणवळणाचा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.
काही वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि अर्जुना धरणाच्या विसर्गाच्या जोरदार प्रवाहामुळे हा जुना पूल मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाला होता. त्यामुळे जामदा खोरे परिसरातील गावांचा आणि लगतच्या वाड्या-वस्त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटून नागरिकांचे अतोनात हाल झाले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या पुलाची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र धरणातून होणारा पाण्याचा वेगवान विसर्ग आणि दरवर्षी उद्भवणारी पूरस्थिती यामुळे या तात्पुरत्या दुरुस्तीला मर्यादा येत होत्या व पुलाची वारंवार हानी होत होती.
या समस्येची गंभीर दखल घेत आमदार किरण सामंत यांनी पाटबंधारे विभागाकडे तातडीने पाठपुरावा करून या संवेदनशील ठिकाणी नव्याने भक्कम व सुरक्षित पूल बांधण्याची शिफारस केली होती. त्यानुसार पाटबंधारे खात्याने या पुलाच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. नवीन पुलाच्या निर्मितीमुळे पाचल, तळवडे, जवळेथर यांसह संपूर्ण जामदा खोऱ्यातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होणार असून, परिसरातील ग्रामस्थांनी व प्रवाशांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार किरण सामंत यांचे आभार मानले आहेत.




