काठमांडू : गेल्या तीन दिवसांपासून नेपाळमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाने हाहाकार माजवला असून निसर्गाच्या भीषण प्रकोपात २४ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर १४ जण अद्याप बेपत्ता आहेत. रविवारी डोंगराचा एक भलामोठा भाग क्षणार्धात खचून खाली वेगाने वाहणाऱ्या काली गंडकी नदीच्या पात्रात कोसळल्याची थरारक घटना घडली. काही सेकंदांतच माती आणि महाकाय दगडांचा प्रचंड ढिगारा उतारावरून खाली आल्याने नदीचा नैसर्गिक प्रवाह मलब्याने पूर्णपणे तुंबला. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यात जिवाच्या आकांताने नागरिकांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने घरे, रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान झाले असून सुमारे ७४७ कुटुंबांवर या संकटाची थेट कुऱ्हाड कोसळली आहे.
नेपाळमधील पाच जिल्ह्यांना या आपत्तीचा सर्वाधिक तडाखा बसला असून बागलुंग, म्याग्दी, मनांग, पर्वत आणि पाल्पा या भागांत भूस्खलनाने मृत्यूचे तांडव घडवले आहे. अधिकृत माहितीनुसार, बागलुंगमध्ये सर्वाधिक १०, म्याग्दीमध्ये ६, पाल्पामध्ये ५ आणि मनांगमध्ये २ निष्पापांचा बळी गेला आहे, तर मिथिला नगरपालिकेत (जि. धनुषा) एका व्यक्तीचा दरड कोसळून अंत झाला. बेपत्ता असलेल्या १४ जणांमध्ये मनांगमधील १०, म्याग्दीतील ३ आणि बागलुंगमधील एकाचा समावेश असून लमजुंग, बागलुंग व म्याग्दी येथे नागरिक जखमी झाले आहेत. पर्वत जिल्ह्यात परिस्थिती अत्यंत बिकट बनली असून एकट्या या जिल्ह्यात १०६ घरे जमीनदोस्त झाली आहेत, तर चार घरांचे अंशतः नुकसान होऊन १६२ कुटुंबांतील ५४० नागरिकांना तात्काळ विस्थापित व्हावे लागले आहे. दक्षिणेकडील तराई पट्ट्यातही पुराचे पाणी साचून जमिनीची मोठी धूप झाली आहे.
गंडकी प्रांतात आपत्तीची तीव्रता सर्वाधिक असून १९५ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त, २६ घरांची पडझड आणि सुमारे २७० घरांना धोका निर्माण झाला आहे; परिणामी १,५०० हून अधिक नागरिकांना घरे सोडून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले आहे. संपूर्ण देशात आतापर्यंत १४३ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त, तर ५१ घरांचे अंशतः नुकसान झाल्याची नोंद आहे. डोंगराळ भागात सततच्या पावसामुळे दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच असल्याने बचावकार्यात मोठे अडथळे येत आहेत. संपर्क तुटलेल्या बाधित भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे आणि बंद पडलेले दळणवळणाचे रस्ते तातडीने पूर्ववत करण्याचे मोठे आव्हान सध्या स्थानिक प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.






