रत्नागिरी : श्री संत कीसन महाराज सुडके आश्रमाच्या वतीने प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या मानाच्या राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कारांची नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आली असून, यंदा नाट्यवाङ्मय विभागात ज्येष्ठ लेखक उदय गणपत जाधव यांच्या ‘गार्गी आणि इतर एकांकिका’ या पुस्तकाची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राज्यभरातून विविध वाङ्मय प्रकारांत मोठ्या प्रमाणावर साहित्यकृती दाखल झाल्या होत्या. तज्ज्ञ निवड समितीने अत्यंत चोख, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने सर्व साहित्याचे परीक्षण करून अंतिम नावांवर शिक्कामोर्तब केले. त्यामध्ये नाट्यक्षेत्रातील वैविध्यपूर्ण, कसदार आणि वास्तवदर्शी मांडणीसाठी उदय जाधव यांच्या एकांकिकासंग्रहाने बाजी मारत हा बहुमान पटकावला आहे.
समाजातील संवेदनशील पैलू आणि मानवी नात्यांची सखोल गुंफण प्रभावीपणे मांडणाऱ्या उदय जाधव यांच्या या संग्रहाने समीक्षक आणि वाचकांची आधीच मने जिंकली होती. आता या राज्यस्तरीय पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या समृद्ध लेखणीचा पुन्हा एकदा गौरव झाला असून, त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल साहित्यिक, नाट्यकर्मी आणि रसिकांकडून जाधव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, सर्वच स्तरातून त्यांचे उत्स्फूर्त अभिनंदन करण्यात येत आहे. लवकरच एका भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.





