महावितरणची ३८ कोटींची थकबाकी प्रलंबित
रत्नागिरी : ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर वाढलेल्या प्रचंड उकाड्याने आणि तीव्र उन्हाच्या झळांनी संपूर्ण रत्नागिरी जिल्हा अक्षरशः होरपळून निघाला आहे. मंगळवारी जिल्ह्याचा पारा तब्बल ३९.२ अंश सेल्सिअसच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्यानंतर बुधवारी तापमान ३५ अंशांवर घसरले असले, तरी सरासरीपेक्षा ७.६ अंशांनी अधिक उष्णता नोंदवली गेल्याने नागरिकांची काहिली कायम आहे. जून आणि जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसानंतर वरुणराजाने दीर्घकाळ विश्रांती घेतल्यामुळे उष्णतेची तीव्रता अधिकच वाढली असून, तापमानाने तब्बल १४३ वर्षांचा उच्चांक मोडल्याचा दावा केला जात आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होणारा असह्य उकाडा सायंकाळी उशिरापर्यंत टिकून राहत असून, रात्रीच्या वेळीही उष्ण हवा कायम राहत असल्याने नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. या ‘ऑक्टोबर हिट’चा थेट परिणाम दैनंदिन जनजीवनासह वीजवापरावरही दिसून येत असून, जिल्ह्यातील विजेची दैनंदिन मागणी १६० मेगावॉटवरून एकदम १८० मेगावॉटवर पोहोचली आहे.
वाढत्या उकाड्यापासून बचाव करण्यासाठी घराघरांत पंखे, एअर कंडिशनर आणि कुलरचा अविरत वापर सुरू असल्याने अवघ्या काही दिवसांत २० मेगावॉट विजेचा भार वाढला आहे. विशेषतः दिवसभराच्या काहिलीनंतर रात्रीच्या वेळी एसी आणि कुलरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने रात्री विजेचा भार अधिक उंचावत आहे. जिल्ह्यात अधिकृतरीत्या कोणतेही भारनियमन लागू करण्यात आले नसले, तरी राज्यभरात विजेच्या मागणीत झालेली अचानक वाढ आणि वीजनिर्मिती यातील तफावतीमुळे काही भागांत तात्पुरता वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या उद्भवत आहेत. ही तांत्रिक स्थिती सुरळीत राखण्यासाठी महावितरणची यंत्रणा सातत्याने कार्यरत आहे. विजेची मागणी वेगाने वाढत असतानाच दुसरीकडे महावितरणसमोर ग्राहकांकडील तब्बल ३८ कोटी रुपयांच्या वीजबिल थकबाकी वसुलीचे गंभीर आव्हान उभे ठाकले आहे.
जिल्ह्यात दरमहा सुमारे १४० कोटी रुपयांची वीजबिल आकारणी होते; मात्र विविध वर्गवारीतील सहा लाख १० हजार ग्राहकांपैकी अनेकांकडे कोट्यवधींची थकबाकी अडकून पडल्याने महावितरणच्या महसुलावर प्रचंड ताण आला आहे. यामध्ये रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमधील सार्वजनिक पथदिव्यांचे सात कोटी ३९ लाख रुपये, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे चार कोटी २१ लाख रुपये आणि विविध शासकीय कार्यालये व संस्थांकडील सुमारे पाच कोटी रुपयांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी ग्राहकांना आपली प्रलंबित बिले वेळेत भरण्याचे आवाहन केले आहे. तसेच रात्रीच्या वेळेतील वीज यंत्रणेवरील अतिरिक्त भार हलका करण्यासाठी ग्राहकांनी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत इस्त्री, पाण्याचे पंप यांसारख्या जास्त वीज वापरणाऱ्या उपकरणांचा वापर करावा, ज्यामुळे काही नियमांनुसार सवलतीचा लाभही मिळू शकेल, असे सूचित करण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेचे संकट आणि थकबाकी वसुली या दुहेरी पेचातून मार्ग काढण्यासाठी महावितरण सध्या कसरत करत आहे.




