रत्नागिरी : शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने नोटीस बजावली असतानाही, आदेश धाब्यावर बसवून कर्ला जेटीवरून नौका व त्यावरील साहित्य स्थलांतरित केल्याप्रकरणी नौका मालकिणीविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुगंधा सचिन टाकळे (रा. पंधरा माड, मिरगवाडा, ता. जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी चिन्मय संजय जोशी (वय ३०, रा. नाचणे रोड, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, कर्ला जेटी परिसरात संशयित आरोपी यांच्या मालकीची ‘गुरुप्रसाद’ (नोंदणी क्रमांक IND-MH-4-MM-3766) ही नौका उभी होती. मत्स्य व्यवसाय विभागाकडून सदर नौका तसेच त्यावरील मासेमारी साहित्य परस्पर इतरत्र स्थलांतरित करू नये, अशा स्पष्ट सूचना व कायदेशीर नोटीस नौका मालकिणीला बजावण्यात आली होती. असे असतानाही ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते १० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान, संबंधित यंत्रणेच्या पूर्वपरवानगीशिवाय ही नौका आणि साहित्य जेटीवरून हलवण्यात आले. प्रशासनाच्या कायदेशीर आदेशाची जाणीवपूर्वक अवज्ञा केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले.
या तक्रारीच्या आधारे रत्नागिरी शहर पोलिसांनी संशयित आरोपी सुगंधा टाकळे यांच्याविरुद्ध शासकीय आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३(a) (तत्कालीन भा.दं.वि. कलम १८८) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.






