खेड : राज्यात जाहीर झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पाणीटंचाईचे सावट गडद होत असताना, त्यावर मात करण्यासाठी शासन स्तरावर जलसंधारण अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे. या अभियानाला कृतीची जोड देत खेड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बिजघर नंबर १ ने सामाजिक जाणिवेतून पुढाकार घेत शिवपार्वती मंदिराजवळील ओढ्यावर वनराई बंधारा उभारला आहे. शाळेने ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या भक्कम सहकार्यातून तब्बल पंधरावा बंधारा यशस्वीरीत्या बांधून संपूर्ण परिसरासमोर पाणी बचतीचा आणि श्रमदानाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागल्याने ओढ्या-नाल्यांतील वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे काळाची गरज बनली आहे. हे ओळखून बिजघर नंबर १ शाळेने हा उपक्रम हाती घेतला. या श्रमदान मोहिमेप्रसंगी बिजघर ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा तिसंगी केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्र जाधव, ग्रामपंचायत अधिकारी रमेश निकम यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, शिक्षक शैलेश पराडकर, संदीप घाणेकर, विजय सकपाळ आणि सर्व शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून बंधाऱ्याच्या कामात हातभार लावला. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून आणि ग्रामस्थांच्या एकजुटीतून उभा राहिलेला हा वनराई बंधारा परिसरातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करत उपस्थितांनी शाळेच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.





