खेड (प्रतिनिधी) : स्थानिक महिलांच्या अंगभूत कौशल्याला योग्य बाजारपेठ मिळवून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने, खेड नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आयोजित ‘सावित्रीबाई शहर वस्तीस्तर महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवा’चे उद्घाटन शिवतेज आरोग्य संस्था, तीनबत्ती नाका येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले. ग्रामीण व शहरी भागातील महिलांनी स्वतःच्या कल्पकतेतून, अखंड मेहनतीतून आणि कौशल्यातून निर्माण केलेल्या विविध आकर्षक तसेच दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील उद्योगशीलतेला प्रोत्साहन मिळून त्यांच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा मिळावी, या व्यापक दृष्टीकोनातून या भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यास खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, खेड नगरपरिषदेचे नगरसेवक गटनेते तथा भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रहीम सहिबोले, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, गटनेते तथा नगरसेवक निकेतन पाटणे, नगरसेवक तौसीफ खोत, स्वप्निल सैतवडेकर, आरिफ मुल्लाजी, मिनार चिखले तसेच विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका स्वप्नाली चव्हाण, दीप्ती शिगवण, अंजुम कुरणे, आरती पवार, संजना कुडाळकर, रेश्मा खतीब, वर्षा सापटे, रसिका खेडेकर यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी बचत गटांच्या या स्तुत्य उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. महिलांनी केवळ कौटुंबिक जबाबदाऱ्यांपुरते मर्यादित न राहता स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रात आत्मविश्वासाने पाऊल टाकावे, सक्षमपणे स्वावलंबनाची वाट धरावी आणि आर्थिकदृष्ट्या अधिक बळकट व्हावे, असे प्रतिपादन करत मान्यवरांनी सर्व बचत गटांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महिलांच्या कलागुणांना योग्य संधी उपलब्ध करून देणारा आणि त्यांच्या उद्योजकतेला नवी उभारी देणारा हा महोत्सव खेड परिसरातील महिलांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत असून, नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन महिलांच्या उत्पादनांना प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.





