रत्नागिरी : ‘सेवा परमो धर्म:’ हा विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात आजपासून ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू करण्यात आले. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा शुभारंभ कोकणनगर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिराने करण्यात आला.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते फीत कापून आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन तसेच धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.
शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यावर भर
मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी अभियानाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, शासनाच्या विविध सेवा आणि योजनांचा अधिकाधिक लाभ नागरिकांना मिळवून देणे हा या अभियानाचा मुख्य संकल्प आहे. अभियानाच्या कालावधीत ‘आरोग्याचा श्री गणेशा’, वृद्धांची देखभाल, विशेष लसीकरण मोहिमा तसेच आयुष केंद्रांवर योगसाधना यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन उपलब्ध आरोग्य सेवा आणि योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनीही अभियानाला शुभेच्छा देत नागरिकांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तसेच आरोग्य सेवांचा सक्रियपणे लाभ घेण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, गटविकास अधिकारी उमेश गावधडकर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ; कोकणनगर आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिरासह वृक्षारोपण
Leave a Comment





