रत्नागिरी: देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज पोलीस कवायत मैदानावर मानवंदना देऊन अत्यंत भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचा प्रारंभ शिस्तबद्ध पद्धतीने शोकशस्त्र कवायत सादर करून करण्यात आला. त्यानंतर वर्षभरात देशाच्या विविध भागांत देशसेवेचे कर्तव्य पार पाडताना वीरमरण प्राप्त झालेल्या १५४ अमर हुतात्मा पोलीस अधिकारी व जवानांच्या नावांचे गौरवपूर्वक वाचन करण्यात आले. या वेळी मैदानावर उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकारी, जवान आणि नागरिकांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून मौन पाळत शहीद पोलिसांच्या पवित्र स्मृतींना नतमस्तक होऊन अभिवादन केले.
या स्मृतिदिन संचलनाला आणि श्रद्धांजली सभेला भारतीय तटरक्षक दलाचे कमांडंट शैलेश गुप्ता, रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्यासह जिल्हा पोलीस दलातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशाच्या अखंडतेसाठी आणि शांततेसाठी आपले सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या शूर पोलिसांचे अतुलनीय शौर्य, त्याग आणि निस्वार्थ कर्तव्यनिष्ठा संपूर्ण पोलीस दलासह प्रत्येक देशवासीयासाठी सदैव प्रेरणादायी राहील, अशा शब्दांत उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत हुतात्म्यांच्या बलिदानाला विनम्र वंदन केले.







