डिंगणी फीडरवरून वीजपुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न; पुरवठा पूर्ववत झाल्यास ९० टक्के भागाला दिलासा
संगमेश्वर : संगमेश्वर परिसरात शनिवारी (दि. २४ ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जोरदार वाऱ्यामुळे वीजवाहिनीचे नुकसान झाल्याने संगमेश्वर शहराचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. संगमेश्वर फीडरवर नारळाच्या झावळ्या पडल्याने वीजवाहिनीचे फॅब्रिकेशन तुटले असून, कंडक्टरही तुटल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.
या घटनेमुळे संगमेश्वर शहरातील वीजपुरवठा बंद पडला असून, तो लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न सुरू आहेत. संगमेश्वर शहराचा वीजपुरवठा डिंगणी फीडरवरून सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. डिंगणी फीडरवरून वीजपुरवठा सुरू करण्यात यश आल्यास शहरातील सुमारे ९० टक्के भागातील वीजपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता महावितरणने व्यक्त केली आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महावितरण संगमेश्वरकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे.






