आरवली (प्रतिनिधी): संगमेश्वर तालुक्यातील कडवई रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची गेल्या तीन वर्षांपासून अत्यंत बिकट अवस्था झाली असून कोकण रेल्वे प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे स्थानिक प्रवासी आणि वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या रेट्यामुळे सहा वर्षांपूर्वी आंदोलनाच्या बळावर अस्तित्वात आलेल्या या स्थानकाकडे सुरुवातीपासूनच प्रशासनाचे दुर्लक्ष राहिले आहे.
स्थानकावर प्लॅटफॉर्मचा अभाव तसेच पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सोयी-सुविधांची वानवा असतानाही दिवा-रत्नागिरी पॅसेंजरसह क्रॉसिंगच्या वेळी थांबणाऱ्या गाड्यांमुळे येथे प्रवाशांची नियमित वर्दळ असते आणि त्यातून कोकण रेल्वेला चांगले उत्पन्नही मिळत आहे. तरीही स्थानकाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे उखडला असून दुतर्फा वाढलेल्या गर्द झाडीझुडपांमुळे हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. मनसेच्या वतीने नुकतेच आणखी काही गाड्या थांबवण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले असताना दुसरीकडे मार्गाची डागडुजी वारंवार मागणी करूनही प्रलंबित ठेवण्यात आली आहे.
प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे अखेर येथील स्थानिक रिक्षा संघटना आक्रमक झाली असून, रेल्वे प्रशासनाने तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडत रस्त्यावर उतरण्याचा इशारा रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी दिला आहे. त्यामुळे आता कडवई पंचक्रोशीतील संतप्त प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वे प्रशासन काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.







