राजापूर : वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी दीडशे वर्षांहून अधिक काळ अविरत कार्यरत असणाऱ्या येथील ऐतिहासिक राजापूर नगर वाचनालयाच्या वतीने सन २०२५-२६ या वर्षाचे ‘कै. सावित्री केरू गोंडाळ स्मृती उत्तम वाचक पुरस्कार’ नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. यंदाचा सर्वोत्कृष्ट वाचक पुरुष पुरस्कार डॉ. श्रीकांत जयकृष्ण मलातपुरे यांना तर सर्वोत्कृष्ट वाचक महिला पुरस्कार श्रीमती सोनी एडके यांना जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने वाचनालयाने यंदापासून सुरू केलेल्या पहिल्यावहिल्या ‘उत्तम बालवाचक पुरस्कारा’साठी नियमित बालवाचक चि. प्रणव संतोष मोंडे याची निवड करण्यात आली आहे. कै. बी.के. गोंडाळ आणि सौ. मानसी हजेरी यांनी दिलेल्या देणगीतून दिले जाणारे हे पुरस्कार सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम अशा स्वरूपाचे आहेत.
वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता वाचनालयाच्या सभागृहात हा गौरव सोहळा रंगणार आहे. चिपळूण येथील प्रसिद्ध लेखक, ज्येष्ठ पत्रकार, उद्योजक आणि समाजसेवक डॉ. प्रशांत पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात येणार असून, या सोहळ्यानंतर डॉ. पटवर्धन यांचे ‘नवनिर्मितीचे ऋषी – परशुराम’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रभात पाध्ये, कार्यवाह जयंत अभ्यंकर आणि संचालक मंडळाने सर्व पुरस्कारार्थींचे कौतुक करत या प्रेरणादायी सोहळ्यास तसेच व्याख्यानास राजापूरमधील सर्व वाचकप्रेमी, आबालवृद्ध व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.






