रत्नागिरीचे आराध्यदैवत श्रीदेव भैरी मंदिरासह पालखी भेट सोहळ्याची हुबेहूब प्रतिकृती
संगमेश्वर / दिनेश आंब्रे: कोकणातील पारंपरिक सण, संस्कृती आणि धार्मिक परंपरेचे दर्शन घडविणारा अनोखा देखावा संगमेश्वर तालुक्यातील नावाडी येथील कु. साहिल सुनील आंबवकर याने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त साकारला आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून गणेशोत्सवात विविध नाविन्यपूर्ण देखावे सादर करणाऱ्या साहिलने यंदा कोकणातील दोन महत्त्वाचे सण असलेल्या गणेशोत्सव आणि शिमगोत्सवाची सांगड घालत आकर्षक देखावा उभारला आहे.
या देखाव्यामध्ये रत्नागिरीचे आराध्यदैवत श्रीदेव भैरी यांचे मंदिर हुबेहूब साकारण्यात आले असून, शिमगोत्सवातील नवलाई-पावणाई (सडामिऱ्या) आणि नवलाई-पावणाई (जाकीमिऱ्या) पालखी भेट सोहळ्याची प्रतिकृतीही साकारण्यात आली आहे. यासोबतच श्रीदेव भैरी सहाणेवरील पालखी तसेच शिमगोत्सवातील सुरमाड यांचे बारकावे जपत केलेले सादरीकरण विशेष आकर्षण ठरत आहे.
कोकणची संस्कृती, पारंपरिक राहणीमान, घरांची व मंदिरांची वैशिष्ट्यपूर्ण रचना, धार्मिक श्रद्धा आणि निसर्गाशी असलेले नाते या सर्वांचा सुरेख मेळ या देखाव्यात साधण्यात आला आहे. त्यामुळे हा देखावा पाहताना कोकणातील पारंपरिक सण-उत्सवांचा जिवंत अनुभव मिळत असून, भाविक आणि नागरिकांकडून त्याचे कौतुक होत आहे.
गणेशोत्सवातील बाप्पाच्या आगमनाचेही देखाव्यात विशेष चित्रण करण्यात आले आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रतीक म्हणून एसटी बसेस दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात परतणाऱ्या चाकरमान्यांची भावनिक नाळही या देखाव्यातून अधोरेखित झाली आहे.
हा देखावा साकारण्यासाठी साहिलने आपल्या कुटुंबीयांच्या सहकार्याने तब्बल दोन महिने मेहनत घेतली. देखावा तयार करताना प्रत्येक घटकाचे बारकाईने निरीक्षण करून त्याला वास्तवदर्शी स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमासाठी मित्र सुशांत भोसले, अकील जाधव, धनश्री तसेच मित्रपरिवाराचेही मोलाचे सहकार्य लाभले.
दरवर्षी काहीतरी वेगळे आणि नाविन्यपूर्ण सादर करण्याची परंपरा कायम ठेवत साहिलने यंदा कोकणच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाला गणेशोत्सवाच्या माध्यमातून उजाळा दिला आहे. त्यामुळे त्याचा हा देखावा केवळ सजावट न राहता कोकणच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडविणारा कलात्मक उपक्रम ठरला आहे.






