मुंबई : मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे परिसरातील ‘त्विशा’ हॉटेलमध्ये गाणे बदलण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात थेट गोळीबार आणि चॉपरने वार झाल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली आहे. या रक्तरंजित हाणामारीमुळे हॉटेल परिसरात एकच खळबळ उडाली असून, भिवंडी तालुका पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही बाजूंच्या तब्बल ११ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण थराराचे सीसीटीव्ही चित्रीकरणही समोर आले असून ते समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये मुसा भाईचे गाणे वाजत असताना एका गटाने ते थांबवून मराठी गाणे लावण्याची मागणी केली. याच मुद्द्यावरून दुसऱ्या गटाशी खटका उडाला आणि साऊंड बॉक्स स्वतःच्या टेबलकडे ओढण्याच्या प्रयत्नातून हा वाद अधिक चिघळला. शाब्दिक बाचाबाची व शिवीगाळीतून सुरू झालेला हा वाद काही क्षणांतच हाणामारीत बदलला आणि दोन्ही बाजूंकडून लाथाबुक्क्यांनी एकमेकांवर हल्ला चढवण्यात आला.
हा वाद पराकोटीला पोहोचल्यानंतर एका गटातील साईनाथ पाटील याने कमरेला लावलेले पिस्तूल काढून विरोधी गटाच्या दिशेने गोळी झाडल्याचा गंभीर आरोप आहे; तर दुसऱ्या गटाकडून धारदार चॉपर उपसून वार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या हिंसक झटापटीत काही जण जखमी झाले असून उपस्थित ग्राहकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, एका तक्रारीत पाच जणांचा तर दुसऱ्या तक्रारीत तीन जणांसह सात ते आठ अज्ञात इसमांचा समावेश आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या मिळून ११ आरोपींना अटक केली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.






