ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह; पूर्वसूचना देऊनही अधिकारी कार्यालयात अनुपस्थित
संगमेश्वर (विशेष प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्यासह विविध शहरांमधून चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणातील आपल्या गावी दाखल झाले आहेत. देवळे गावातही गणरायाचे उत्साहात आगमन झाले असताना ऐन सणासुदीच्या काळात ग्रामस्थ आणि गावी आलेल्या चाकरमान्यांना मात्र पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. गावातील अनेक वाड्यांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
देवळे गावातील सुतारवाडी, कुंभारवाडी, शिंदेवाडी यांसह अनेक वाड्या पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीच्या नळपाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहेत. या वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र विहीर किंवा बोअरवेलची पुरेशी व्यवस्था नसल्याने ग्रामपंचायतीकडून होणारा पाणीपुरवठा हा ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात घराघरांत चाकरमानी आणि पाहुणे दाखल झालेले असताना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांसह ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.
पाणीटंचाईबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार विनंती करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सणासुदीच्या दिवसांत घरातील दैनंदिन गरजा भागविण्यासाठीही पाण्याची कमतरता भासत असल्याने ‘गणेशोत्सव साजरा करायचा की पाण्यासाठी भटकायचे?’ असा सवाल संतप्त ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
दरम्यान, गावातील पाणीटंचाई, विकासकामे आणि इतर मूलभूत प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ‘देवळे ग्रामविकास मंडळ, मुंबई’च्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाशी पत्रव्यवहार करून भेटीसाठी वेळ मागण्यात आली होती. त्यानुसार १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ निर्मल ग्रुप ग्रामपंचायत देवळेच्या कार्यालयात दाखल झाले. मात्र, पूर्वकल्पना देऊनही कार्यालयात कोणताही जबाबदार प्रशासकीय अधिकारी अथवा ग्रामविकास अधिकारी उपस्थित नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे आपल्या समस्या मांडण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या काळात गावात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल झाले असताना निर्माण झालेल्या पाणीटंचाईची तातडीने दखल घेऊन पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीची वरिष्ठ पातळीवरून दखल घेऊन जबाबदारी निश्चित करावी, अशीही मागणी पुढे आली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार आणि संबंधित वरिष्ठ प्रशासनाने या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून पाणीटंचाई दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
संगमेश्वर : देवळे येथे गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांची पाण्यासाठी वणवण
Leave a Comment





