नांदेड: निसर्गाच्या अवकृपेने दुष्काळाच्या दाढेत होरपळणाऱ्या बळीराजाला आता खाजगी फायनान्सच्या पाशवी सावकारीने गिळंकृत करण्यास सुरुवात केली असून नांदेडमध्ये माणुसकीला काळीमा फासणाऱ्या एका थरारक आणि संतापजनक घटनेने अवघा महाराष्ट्र हादरून गेला आहे. अवघ्या ७ हजार रुपयांच्या कर्जापोटी चालवलेल्या अमानुष छळातून मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील ४० वर्षीय शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा नांदेड शहरातील एका खाजगी फायनान्स कार्यालयात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शहरातील हिंगोली गेट परिसरात उघडपणे कारभार चालवणाऱ्या ‘खालसा फायनान्स’ या संस्थेकडून चंद्रकांत शिंदे यांनी गेल्या महिन्याच्या १४ तारखेला सात हजार रुपये घेतले होते; मात्र दहा ते वीस टक्के बेकायदेशीर व्याजाची आकारणी करत कंपनीच्या वसुलीबाजांनी महिन्याभरात या रकमेचा आकडा थेट ७० हजार रुपयांवर नेऊन ठेवला. वसुलीसाठी सातत्याने धमक्या येत असतानाच तीन दिवसांपूर्वी कंपनीच्या गुंडांनी चंद्रकांत शिंदे यांना गावातून भरदिवसा जबरदस्तीने उचलून आणले आणि कार्यालयात डांबून ठेवत बेदम मारहाण सुरू केली.
रात्रीच्या वेळी घरी फोन करून ‘पैसे पाठवा, अन्यथा मारहाण करू आणि आम्ही काहीही करू शकतो’ अशी निर्दयी धमकी एका महिलेने कुटुंबीयांना दिली होती; यापूर्वीही गावातील माणसांना नेऊन सकाळी सोडून दिल्याने शिंदे कुटुंबीयांना वाटले की आपले वडीलही सुरक्षित परत येतील, मात्र शनिवारी भल्या पहाटे कार्यालयात चंद्रकांत यांचा निर्जीव देहच समोर आला. आपल्या एकुलत्या एका मुलाचा असा संशयास्पद अंत पाहून वृद्ध आईने हा सरळसरळ घातपात आणि खून असल्याचा आक्रोश केला असून दोन मुले आणि दोन मुलींच्या डोक्यावरील पित्याचे छत्र एका क्षणात हिरावले गेले आहे. केवळ दोन एकर कोरडवाहू शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबावर आभाळच कोसळले असून जोपर्यंत फायनान्स कंपनीच्या नराधमांवर हत्येचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा संतप्त पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असला, तरी महिन्याभरात दहापट पैशांची बेकायदेशीर मागणी करत एका कष्टकरी बापाचा बळी घेणाऱ्या त्या फायनान्स माफियांच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार, असा संतप्त सवाल विचारत मृत शेतकऱ्याच्या लेकीने फोडलेला हंबरडा प्रत्येकाचे काळीज चिरून टाकत आहे.





