२६५ कोटींच्या कामाला गती; पुढील दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचा राज्यमंत्री योगेश कदम यांचा निर्धार
रत्नागिरी : गेल्या २५ वर्षांपासून प्रशासकीय व तांत्रिक अडचणींच्या गर्तेत अडकलेल्या खेड तालुक्यातील पोयनार लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या कामाला अखेर पूर्ण गती मिळाली आहे. या प्रकल्पाच्या २६५ कोटी ४८ लाख रुपयांच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या (सुप्रमा) कामाचे भूमिपूजन गृह, महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात पार पडले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुढील दोन वर्षांच्या कालावधीत परिसरातील १४ गावांचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असून, कोकणातील सिंचन क्षेत्रासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास ना. कदम यांनी यावेळी व्यक्त केला.
पोयनार येथे आयोजित भव्य समारंभात उपस्थितांना संबोधित करताना राज्यमंत्री कदम यांनी सांगितले की, या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता २७.८९९ दशलक्ष घनमीटर इतकी विस्तीर्ण असून, याद्वारे १४ गावांमधील शेती आणि जनजीवनाला नवे बळ मिळणार आहे. गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळवून कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. पुढील दोन वर्षांत सर्व संबंधित गावांना प्रत्यक्ष पाणी उपलब्ध करून देणे हेच शासनाचे प्राथमिक उद्दिष्ट असून, कामाचा दर्जा आणि गती यावर प्रत्यक्ष देखरेख ठेवली जाणार आहे. या भरीव निधीच्या तरतुदीसाठी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांचे आभार मानले. तसेच मांडवे धरणासाठीही २०० कोटींचा निधी मंजूर झाला असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांतील रखडलेले सर्व सिंचन प्रकल्प कालबद्ध मर्यादेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
धरणाच्या बांधकामासोबतच प्रकल्पग्रस्तांच्या हिताची संपूर्ण काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही देताना ना. कदम यांनी प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया समांतरपणे राबवली जाणार असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही शेतकरी अथवा स्थानिक बाधितावर अन्याय होऊ दिला जाणार नसून, कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असा दिलासा त्यांनी दिला. या भूमिपूजन सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, माजी गृहमंत्री रामदास कदम, माजी आमदार संजय कदम यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध खात्यांचे वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





