नाशिक : काही दिवसांपूर्वी गगनाला भिडलेल्या टोमॅटोच्या दरांना आता अचानक मोठी गळती लागली असून बाजारपेठेत दर कोसळल्याने उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा तीव्र आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या टोमॅटोला प्रति क्रेट अवघा २०० ते २५० रुपये भाव मिळत असल्याने उत्पादन, मजुरी आणि वाहतुकीचा खर्चही भरून निघणे अशक्य झाले आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील संततधार पावसामुळे आवक घटून क्रेटचे दर साडेसातशे ते आठशे रुपयांवर पोहोचले होते; मात्र दरातील या अनपेक्षित घसरणीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी उत्पादन खर्चाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची मात्र मोठी कोंडी झाली आहे.
टोमॅटोच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना एकरी सुमारे दोन लाखांहून अधिक भांडवली खर्च करावा लागतो. त्यातच गेल्या काही दिवसांत वातावरणातील सततच्या बदलांमुळे पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागली, ज्यामुळे उत्पादन खर्चात मोठी भर पडली. सध्या बाजारात मिळणाऱ्या नाममात्र दराच्या तुलनेत प्रत्यक्ष खर्च प्रचंड वाढला आहे. एका क्रेटमागे टोमॅटो तोडणीसाठी २५ रुपये मजुरी आणि बाजार समितीपर्यंत माल पोहोचवण्यासाठी २५ रुपये वाहतूक खर्च असा ५० रुपये केवळ मजुरी व वाहतुकीवरच खर्च होत आहे. त्यामुळे २०० रुपयांच्या क्रेटमधून हा खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात पडणारी रक्कम खते, पाणी आणि औषधांचा खर्च भागवण्यासाठीही अपुरी ठरत आहे.
बाजारपेठेतील सततच्या चढ-उतारामुळे आणि अनिश्चिततेमुळे टोमॅटो उत्पादकांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. शेतात लालबुंद टोमॅटो बहरलेला असतानाही बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतशिवारात टोमॅटोची लाली पूर्णपणे फिकी पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरांमध्ये अशीच घसरण सुरू राहिल्यास लाखो रुपयांचा खर्च करून उभे केलेले पीक मातीमोल होऊन शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या गंभीर परिस्थितीची दखल घेत शासनाने बाजारभावातील ही अस्थिरता रोखण्यासाठी ठोस धोरणात्मक उपाययोजना कराव्यात आणि अडचणीत सापडलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.






