दिल्ली: निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील 10 आणि उत्तराखंडमधील एका जागेचा समावेश आहे.तसेच, पश्चिम बंगालमधील रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीनुसार, विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील संबंधित राज्यसभा जागा रिक्त होणार आहेत. याशिवाय, तृणमूल काँग्रेसच्या खासदार रुक्मिणी मल्लिक यांच्या राजीनाम्यानंतर पश्चिम बंगालमधील एक जागा रिक्त झाली असून, ती भरण्यासाठी पोटनिवडणूक होणार आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी 29 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असून, 6 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. अर्जांची छाननी 7 ऑक्टोबर रोजी होईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर आहे. तर आगामी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू केली जाणार आहे.
उत्तर प्रदेशातून निवृत्त होणाऱ्या राज्यसभा सदस्यांमध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, अरुण सिंह, बृजलाल, बी. एल. वर्मा, राम गोपाल यादव, नीरजा शेखर, गीता उर्फ चंद्रप्रभा, रामजी, सीमा आणि डॉ. दिनेश शर्मा यांचा समावेश आहे. तर उत्तराखंडमधून नरेश बन्सल हे एकमेव निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य आहेत.मतदान प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाने विशेष निर्देश दिले आहेत. मतपत्रिकेवर उमेदवारांना प्राधान्यक्रम देताना रिटर्निंग ऑफिसरकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या, निर्धारित नमुन्याच्या एकसमान जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा लागणार आहे.





