संगमेश्वर (दिनेश अंब्रे): गेली अनेक वर्षे अखंडपणे गणेशोत्सवाचा सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा समर्थपणे जपणार्या येथील ‘उत्कर्ष तरुण मित्र मंडळ’ आयोजित ‘आरवलीचा राजा’ या लाडक्या बाप्पाला आज अत्यंत भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाणार आहे. गेल्या दहा दिवसांपासून मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या या भक्तीमय महोत्सवाची सांगता भव्य विसर्जन मिरवणुकीने होणार असून आरवली परिसरातील वातावरण पूर्णपणे भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर ‘आरवलीच्या राजा’ची प्रतिष्ठापना मोठ्या थाटामाटात करण्यात आली होती. उत्सवादरम्यान नियमित पूजा-अर्चा, नित्य नैमित्तिक महाआरती आणि सुश्राव्य भजनांचे सुरेल कार्यक्रम पार पडले, ज्यामुळे संपूर्ण आरवली पंचक्रोशीत मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. उत्सवाच्या सांगता टप्प्यावर मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजेचे भव्य आयोजन करण्यात आले. या धार्मिक विधीनंतर आयोजित महाप्रसादाचा (भंडारा) लाभ आरवलीसह लगतच्या गावांमधील हजारो भाविकांनी घेतला.
हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. यात प्रामुख्याने दिनेश परकर, शिवा कोंडवीळकर, प्रदीप पटेल, विनायक (बाळा) सुर्वे, जिगणेश पटेल, संतोष पेडणेकर, अशोक कोंडवीळकर, सुदेश पवार, शंकर पटेल, प्रवीण वैष्णव, चैतन्य (भैय्या) परकर, मंदार (बबलू) पिलणकर, वैभव कोंडवीळकर, आश्विन पटेल, विक्रम परकर, मंगेश परकर, मकरंद परकर, मुकुंद जाधव आणि सुजल (गोट्या) पिलणकर आदींनी सक्रिय सहभाग नोंदवत विशेष योगदान दिले.
दहा दिवसांच्या उत्साही पाहुणचारानंतर आज आरवलीच्या राजाची विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या निनादात, गुलालाची मनसोक्त उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या गगनभेदी जयघोषात काढण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सोहळा शिस्तबद्ध पार पडावा यासाठी मंडळाचे कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाने विसर्जन मार्गावर चोख नियोजन केले असून पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.





