दिल्ली: ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी शुक्रवारी सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी शनिवारीपर्यंत राजीनामा दिला नाही, तर त्यांचा पक्ष २ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलन सुरू करेल.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये दीपके यांनी म्हटले की, गांधी जयंतीच्या दिवशी सीजेपी मुंबईतून आपल्या आंदोलनाला सुरुवात करेल आणि त्यानंतर हे आंदोलन देशभरात नेले जाईल. त्यांनी म्हटले, “या गांधी जयंतीला लोकशाही वाचवण्याचा संकल्प करूया.”मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करताना दीपके यांनी इशारा दिला की, त्यांची मागणी मान्य झाली नाही, तर ते ‘जंतर-मंतर २.०’ आंदोलन सुरू करतील.
दीपके यांनी निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचा आरोप करूनही निवडणुका लढवणाऱ्या विरोधी पक्षांवरही टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशा निवडणुकांमध्ये सहभागी होऊन विरोधी पक्ष त्यांना वैधता देतात आणि निवडणुका स्वतंत्र व निष्पक्ष असल्याचा भ्रम कायम ठेवण्यास मदत करतात.ते म्हणाले, “होय, निवडणुकांमध्ये गैरप्रकार होत आहेत. मात्र, जेव्हा तुम्ही अशा गैरप्रकार झालेल्या निवडणुकांमध्ये सहभागी होत राहता, तेव्हा तुम्ही या निवडणुकांना वैधता देता आणि त्या स्वतंत्र व निष्पक्ष असल्याचा भ्रम कायम ठेवण्यास मदत करता.”
विरोधी पक्ष निवडणुका लढवत आहेत, कारण निवडणुकांपासून दूर राहिल्यास त्यांचे राजकीय अस्तित्वच संपुष्टात येईल, अशी त्यांना भीती आहे का, असा सवालही दीपके यांनी उपस्थित केला.
दीपके यांनी विरोधी पक्षांवर निवडणुकीतील गैरप्रकारांचे आरोपही निवडक पद्धतीने केल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे आरोप कोणत्या राज्यात किंवा कोणता राजकीय पक्ष सत्तेत आहे, यावर अवलंबून केले जातात. सीजेपीच्या संस्थापकांनी केलेली ही वक्तव्ये निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर समोर आली आहेत.
नुकतेच एका वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत एसआयआर प्रक्रियेतील बदलांशी संबंधित निर्णय आणि आदेशांवर किमान १४ वेळा आक्षेप नोंदवले होते.मात्र, यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, एसआयआरशी संबंधित निर्णयांसह सर्व निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आले होते आणि त्यांना दोन्ही निवडणूक आयुक्त तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांची मंजुरी होती.





