मुंबई: कुर्ला पश्चिम परिसरातील १२ मजली कोहिनूर इमारत क्रमांक ५ मध्ये मंगळवारी अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे पाच वर्षांच्या बालकासह नऊ रहिवासी जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. इमारतीच्या इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगला आग लागल्याने काही वेळातच संपूर्ण इमारतीत दाट धुराचे साम्राज्य पसरले, ज्यामुळे अनेक नागरिकांना श्वास घेण्यास तीव्र त्रास जाणवू लागला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी सुमारे अर्ध्या तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवत इमारतीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
या दुर्घटनेत चार पुरुष आणि पाच महिला अशा एकूण नऊ जणांना धूर व आगीची बाधा झाली असून, जखमींमध्ये मोहम्मद शेख (वय ५), इशान अहमद (वय ३०), फरीना बोनो (वय २७), एजाज अहमद (वय ६५), फरीन शेख (वय १८), नायदा शेख (वय १४), कलिमा साहा (वय ४५), अलीना शेख (वय १७) आणि जाहेद अली शेख (वय ५५) यांचा समावेश आहे. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे स्पष्ट केले आहे. या आगीच्या नेमक्या कारणांचा सखोल तपास कुर्ला पोलीस ठाण्याचे पथक करत आहे.




