रत्नागिरी : पावस येथील पानगलेवाडी परिसरातून कामासाठी रत्नागिरीला जातो असे सांगून घराबाहेर पडलेला २८ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. त्याचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याचा संशय असून, या प्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) अधिनियम २०२३ चे कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव विठ्ठल पवार (वय २८, रा. उद्यमनगर रोड, बाष्टे कंपाऊंड, रत्नागिरी) हा १८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास पानगलेवाडी, पावस येथील घरातून “मी रत्नागिरी येथे कामाला जातो” असे सांगून बाहेर पडला होता. मात्र, घरातून निघाल्यानंतर तो पुन्हा घरी परतला नाही.
गौरवचा शोध घेऊनही त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर त्याचे अज्ञात इसमाने बेकायदेशीररीत्या अपहरण करून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी गौरवची मावशी वृषाली सुरेश कदम (वय ६०, रा. पानगलेवाडी, पावस, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी गु.र.नं. ८०/२०२६ नुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याची नोंद २५ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे १.५२ वाजता करण्यात आली असून, गौरव पवार याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अपहरणामागील नेमके कारण तसेच संशयित व्यक्तीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.





