रत्नागिरी/ वैभव पवार: राज्यावर ओढवलेल्या गंभीर दुष्काळी संकटाची जाणीव ठेवून कोकण मराठी साहित्य परिषदेने (कोमसाप) मालगुंड येथे नियोजित असलेले १८ वे मध्यवर्ती साहित्य संमेलन पुढे ढकलण्याचा अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे. कवी केशवसुत स्मारक येथे येत्या २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान रंगणारा हा साहित्योत्सव आता तात्पुरता स्थगित करण्यात आला असून, वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण मुंबई किंवा ठाणे येथे केले जाणार असल्याची माहिती कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर आणि कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ यांनी शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या या पत्रकार परिषदेस कोमसापचे कार्यवाह माधव अंकलगे, १८ व्या संमेलनाचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन ऊर्फ आबा पाटील, युवा समितीचे अरुण मोर्ये आणि जिल्हा सचिव मुश्ताक खान आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
संमेलनाच्या आयोजनाची सर्व तयारी पूर्ण झाली असतानाच, कोमसापचे विश्वस्त तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी सविस्तर विचारविनिमय करून हा निर्णय अंतिम करण्यात आला. राज्यात १९७२ नंतर उद्भवलेली ही सर्वांत भीषण दुष्काळी परिस्थिती असून, तब्बल ४०० हून अधिक तालुक्यांमध्ये टंचाईचे सावट आहे. विदर्भ, मराठवाड्यासह कोकणातही पाणी, चारा आणि अन्नाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असताना अशा संकटकाळात संमेलनाचा सोहळा साजरा करणे योग्य ठरणार नाही, अशी ठाम भूमिका नमिता कीर यांनी मांडली.
राज्यातील परिस्थिती पूर्ववत आणि सुरळीत झाल्यानंतरच साहित्य संमेलनाचे प्रत्यक्ष आयोजन करण्यात येईल, तसेच वाङ्मयीन पुरस्कार वितरण सोहळ्याची निश्चित तारीख ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांच्याशी सल्लामसलत करून लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही कोमसापच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.






