रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांसह रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची सुरक्षितता, शिस्त आणि मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला असून हाणामारी, मद्यधुंद प्रवाशांचा उपद्रव, विनातिकीट प्रवास आणि प्रसाधनगृहांची नियमबाह्य वसुली यांसारख्या गंभीर समस्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी ठाम मागणी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे. या संदर्भात महासंघाच्या जिल्हा प्रभारी अध्यक्षा तथा ‘व्ही रूट्स सोशल फाउंडेशन’च्या संस्थापिका वर्षा विनायक चव्हाण यांनी रेल्वे प्रशासनाला सविस्तर निवेदन सादर करत, प्रलंबित समस्या तातडीने न सुटल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.
सादर करण्यात आलेल्या निवेदनानुसार, रेल्वे स्थानक परिसर आणि धावत्या गाड्यांमध्ये वाढलेली हाणामारी, दारू पिऊन गोंधळ घालणारे समाजकंटक, प्रतिबंधित भागातील धूम्रपान तसेच गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि लोहमार्ग पोलीस (GRP) यांनी संयुक्त गस्त वाढवून कडक कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. याशिवाय, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत गाड्यांमध्ये नियमित व पारदर्शक तिकीट तपासणी राबवली जावी आणि प्रवाशांशी सौजन्याची वागणूक राखली जावी, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. रत्नागिरी स्थानकावरील स्वच्छतागृहांसाठी प्रवाशांकडून होणारी नियमबाह्य शुल्क वसुली तत्काळ थांबवून स्वच्छ व विनामूल्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा आग्रह यावेळी धरण्यात आला.
स्थानकावरील प्रवाशांची प्रचंड वाढती गर्दी पाहता रत्नागिरीसाठीचा रेल्वे आरक्षण कोटा वाढवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने पाठपुरावा करण्यात यावा तसेच सुरक्षेच्या उपाययोजना करून रखडलेले प्लॅटफॉर्म दुरुस्तीचे काम जलदगतीने मार्गी लावावे, अशी आग्रही मागणी महासंघाने लावून धरली आहे. या सर्व मागण्यांची दखल घेऊन प्रशासनाने कायदेशीर चौकटीत तातडीने ठोस कार्यवाही करावी व त्याबाबत लेखी अहवाल द्यावा, अन्यथा प्रवाशांच्या हक्कासाठी शांततापूर्ण मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन पुकारले जाईल, असा निर्वाणीचा इशारा वर्षा चव्हाण यांनी दिला आहे.





