रत्नागिरी : शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर पडल्यानंतर बंद्यांना समाजात स्वावलंबी आणि सन्मानाने जीवन जगता यावे, या उद्देशाने महाराष्ट्र कारागृह विभागाच्या वतीने रत्नागिरी विशेष कारागृहात कौशल्य विकास उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कारागृहातील २५ बंद्यांनी प्लंबिंग कोर्सचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, त्यांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा नुकताच पार पडला.
अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक डॉ. सुहास वारके आणि विशेष कारागृह महानिरीक्षक तथा कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. मुकुल माधव फाउंडेशन पुणे, जन शिक्षण संस्थान रत्नागिरी आणि स्थानिक आयटीआय यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जून २०२६ पासून या विशेष प्लंबिंग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिक्षाधीन तसेच न्यायाधीन अशा एकूण २५ बंद्यांनी सहभाग घेत हे तांत्रिक कौशल्य आत्मसात केले.
प्रशिक्षणाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या या प्रशिक्षणार्थींना जन शिक्षण संस्थानचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी उपस्थित बंद्यांना मार्गदर्शन करताना डॉ. नातू यांनी या कौशल्याचा उपयोग स्वतःच्या पुनर्वसनासाठी आणि स्वावलंबी भविष्यासाठी करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास फिनोलेक्स कंपनीचे डीजीएम (एचआर) सुजित जगताप, प्लांट एचआर हेड नंदकिशोर शिंपी, व्यवस्थापक एस. रविंद्रन आणि सीएसआर प्रतिनिधी शामराव निंबाळकर उपस्थित होते. तसेच जन शिक्षण संस्थानच्या संचालक निधी सावंत, अमृता शेट्ये, साहिल शेट्ये आणि आयटीआयचे सेवानिवृत्त प्राचार्य भिकाजी नाटेकर यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. कारागृह अधीक्षक सचिन पाटील यांनी शेवटी उपस्थितांचे आभार मानले.





