मुंबई : युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू) देशभरात २८, २९ आणि ३० सप्टेंबर या तीन दिवसांसाठी पुकारलेला देशव्यापी संप रविवारी मध्यरात्री झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मागे घेण्यात आला आहे. रविवारी रात्री साडेनऊ वाजता इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या सविस्तर चर्चेत संपाच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे निश्चित झाल्याने संपासह सर्व नियोजित आंदोलनात्मक कार्यक्रम तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. ऐन सणासुदीच्या तोंडावर सलग तीन दिवस बँकिंग सेवा ठप्प होण्याचे संकट टळल्याने देशभरातील बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांसाठी उर्वरित सर्व शनिवार सुट्टीचे दिवस घोषित करण्याच्या प्रलंबित मुद्द्यावर विचार करण्यासाठी आयबीए आणि यूएफबीयूची एक संयुक्त उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष देविदास तुळजापूरकर यांनी दिली. ही नवनिर्मित समिती उपलब्ध पर्यायांचा सखोल अभ्यास करून सर्व संबंधितांशी चर्चा करेल आणि कर्मचारी तसेच ग्राहक अशा दोघांच्याही दृष्टीने स्वीकारार्ह असणारा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुढील वाटाघाटी पुढे नेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.





