रत्नागिरी : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ शालेय विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी आणि शैक्षणिक कामकाजातील माहितीची अचूकता राखण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या आधार पडताळणी मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्याने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. शिक्षण विभागाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीचे काम तब्बल ९८.२१ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून संपूर्ण राज्यात रत्नागिरीने दुसरा क्रमांक पटकावला आहे. या मोहिमेत संगमेश्वर आणि लांजा तालुक्यांनी विशेष आघाडी घेतली असून, उर्वरित प्रलंबित काम युद्धपातळीवर पूर्ण करून येत्या काही महिन्यांत जिल्हा राज्यात अव्वल स्थानी पोहोचण्याच्या मार्गावर आहे.
शाळांची संच मान्यता पारदर्शक करणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा शैक्षणिक प्रवास सुलभरीत्या ट्रॅक करणे या उद्देशाने २०२२-२३ पासून राज्य व देशपातळीवर ‘युडीआयएसई प्लस’ प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची स्वतंत्र माहिती नोंदवण्याची व्यापक प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षण यंत्रणेने केलेल्या प्रभावी नियोजनामुळे आज हे मोठे यश मिळाले आहे. ऑगस्ट महिन्यातील अधिकृत आकडेवारीनुसार, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये जिल्ह्यात एकूण १ लाख ९१ हजार ६८२ विद्यार्थी नोंदणीकृत आहेत; त्यापैकी १ लाख ९१ हजार ८५ विद्यार्थ्यांचे आधार उपलब्ध झाले असून आतापर्यंत १ लाख ८८ हजार ४० विद्यार्थ्यांची यशस्वी पडताळणी पूर्ण झाली आहे.
सध्या केवळ २ हजार ५४९ विद्यार्थ्यांची पडताळणी प्रलंबित असून एकूण विद्यार्थी संख्येच्या तुलनेत उपलब्धतेचे हे प्रमाण अत्यंत समाधानकारक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. केवळ अडीच हजार विद्यार्थ्यांचे काम शिल्लक असल्याने उर्वरित टप्पाही तातडीने पूर्ण करून १०० टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला आहे.






