गणपतीपुळे/वैभव पवार : जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ म्हणून गणपतीपुळेची ओळख अधिक दृढ होत असताना वाढती पर्यटक संख्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधांच्या समस्यांचा विचार करून गणपतीपुळे परिसरातील गावांसाठी पुढील २० ते २५ वर्षांचा सर्वंकष विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी भगवतीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जागरूक नागरिक वैभव राजाराम घाग यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
गणपतीपुळे परिसरात सध्या रस्त्यांची स्थिती, सांडपाण्याचा प्रश्न, वाहतूक कोंडी, पार्किंगची अपुरी व्यवस्था तसेच रस्त्यालगत होणारी बांधकामे यांसारख्या समस्या सातत्याने जाणवत आहेत. भविष्यात पर्यटकांची संख्या आणखी वाढणार असल्याने या समस्या अधिक गंभीर होण्यापूर्वीच त्यांचे दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक असल्याचे घाग यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. परिसरातील ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करून रस्ते, गटारे, सांडपाणी, पार्किंग आणि बांधकामांच्या नियोजनाबाबत स्पष्ट नियमावली तयार करावी आणि तिची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
गणपतीपुळे हे कोकणातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्याने वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते. विशेषतः सुट्टीच्या काळात तसेच पावसाळ्यानंतर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. गणपतीपुळेतील वाढत्या पर्यटक संख्येचा परिणाम परिसरातील गावांवरही होत असून, या गावांमध्ये पर्यटक निवास आणि होम स्टेची संख्या वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आजपासूनच पायाभूत सुविधांचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे घाग यांनी म्हटले आहे.
रस्ते रुंदीकरणासाठी आवश्यक जागा, गटार व्यवस्था आणि सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध राहील, याचा विचार करूनच भविष्यातील बांधकामांना परवानगी देण्याची आवश्यकता आहे. तसेच वाढत्या पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर पार्किंगसाठी स्वतंत्र जागांचे नियोजन करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. नागरिकांना विश्वासात घेऊन या नियोजनाचे महत्त्व पटवून देतानाच विकास प्रक्रियेत स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
परिसरातील नदी, नाले आणि जलस्रोतांमध्ये प्लास्टिक तसेच इतर कचरा टाकला जाणार नाही, यासाठी ग्रामपंचायती आणि होम स्टे व्यावसायिकांसाठीही स्पष्ट नियम व मार्गदर्शक तत्त्वे असणे आवश्यक असल्याचे घाग यांनी म्हटले आहे. भविष्यात परिसरातील पिण्याचे पाणी स्वच्छ आणि सुरक्षित राहावे, सांडपाण्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन व्हावे, वाहतूक कोंडी टाळता यावी आणि पर्यटकांसाठी पुरेशा पार्किंग सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
या नियोजनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा, अशीही मागणी घाग यांनी केली आहे. योग्य नियोजन, स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि नियमांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास गणपतीपुळे परिसरातील गावे पर्यटनाच्या दृष्टीने अधिक सुंदर, स्वच्छ आणि नियोजनबद्ध करता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
या मागणीचे लेखी निवेदन पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आले असून, गणपतीपुळे परिसराच्या पुढील २० ते २५ वर्षांचा विचार करून सर्वंकष विकास आराखडा तयार करण्यासाठी तातडीने कार्यवाही हाती घ्यावी, अशी मागणी वैभव घाग यांनी केली आहे.






