राजापूर / तुषार पाचलकर : राजापूर तालुक्यातील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दत्तक गाव पाचल येथे एनएसएस सप्ताहांतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी गावातील विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर कचरा संकलित केल्याने या उपक्रमाने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.
या उपक्रमाचे उद्घाटन पाचल ग्रामपंचायतीचे सदस्य विनायक सक्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतिस्थळापासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पाचल बाजारपेठ, आझाद टेकडी परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, ग्रामसचिवालय परिसर तसेच पाचल बसस्थानक परिसरात विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली.
या मोहिमेदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात आढळून आलेला प्लास्टिक कचरा तसेच इतर कचरा स्वयंसेवकांनी गोळा करून कचरा गाडीत भरून पाठविला. यावेळी प्लास्टिकच्या बाटल्या स्वतंत्रपणे संकलित करून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासोबतच कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि व्यवस्थापन करण्याचा संदेशही विद्यार्थ्यांनी या माध्यमातून दिला.
या उपक्रमात पाचल ग्रामपंचायतीचे उपसरपंच आत्माराम सुतार, ग्रामपंचायत सदस्य संजय पाथरे, विनायक सक्रे, दर्शना जाधव, माजी उपसरपंच किशोर नारकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास पाटील, प्रा. एस. जी. चव्हाण, प्रा. पी. पी. राठोड, ग्रामपंचायत अधिकारी संतोष चव्हाण, कर्मचारी कल्पेश सुतार, नंदकुमार पांचाळ, सुभाष काळे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी व स्वयंसेवक सहभागी झाले होते.
स्वच्छता मोहिमेनंतर विद्यार्थ्यांनी स्वच्छता राखण्याची शपथ घेतली. ‘स्वच्छता ही केवळ एका दिवसाची जबाबदारी नसून परिसर सदैव स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे’, असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे राबविलेल्या या स्वच्छता उपक्रमाचे पाचल परिसरातील नागरिक तसेच व्यापारी वर्गातून कौतुक करण्यात येत आहे.






