लांजा (अरबाज नेवरेकर) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत लांजा तालुक्याचा समावेश न झाल्यामुळे स्थानिक शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी आणि आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे लांजाच्या सीमेला लागून असलेल्या राजापूर आणि संगमेश्वर या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळी सवलतींसाठी समावेश करण्यात आला आहे. मात्र, समान भौगोलिक परिस्थिती आणि एकाच पट्ट्यातील हवामान असताना केवळ लांजावरच हा अन्याय का, असा रोखठोक सवाल आता शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.
यंदाच्या खरीप हंगामात लांजा तालुक्याला पावसाच्या मोठ्या खंडाचा तीव्र फटका बसला आहे. वेळेवर पाऊस न झाल्याने भातशेतीसह अन्य खरीप पिकांची वाढ खुंटली असून, तालुक्यातील अनेक भागांत उभी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजाचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. अशा नाजूक व बिकट परिस्थितीत शासकीय मदतीची नितांत गरज असताना लांजा तालुक्याला दुष्काळाच्या निकषांमधून वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे.
दुष्काळग्रस्त घोषित झालेल्या तालुक्यांना शासकीय सवलती, कर्ज पुनर्गठन आणि आर्थिक भरपाईचा लाभ मिळतो. लांजाचा या यादीत समावेश न झाल्याने तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी या सर्व लाभांपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. केवळ कागदी आकडेवारीवर अवलंबून न राहता प्रशासनाने गावनिहाय पर्जन्यमान आणि प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची वस्तुनिष्ठ पाहणी करावी, अशी जोरदार मागणी जोर धरत आहे. शासनाने या निर्णयाचा तातडीने फेरविचार करून लांजातील दुष्काळी स्थितीचा स्वतंत्र अहवाल तयार करावा आणि पात्र शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, असा सूर संपूर्ण तालुक्यातून उमटत आहे.





